रीआन हॉस्पिटलच्या माणुसकीमुळे वाचला प्रतिभाचा जीव
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*रीआन हॉस्पिटलच्या माणुसकीमुळे वाचला प्रतिभाचा जीव*
प्रतिनिधी: रामटेक दिनांक: १६/११/२०२४
पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथे आई-वडिलांच्या घरी आपल्या दोन मुलांसह राहणारी ३४ वर्षीय प्रतिभा परतेती गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती. घरात अठरा विश्वे दारिद्र्य आणि दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी काबाडकष्ट करून पार पाडणारी प्रतिभा आजारपणाने आणखीनच खचलेली होती. औषधोपचारासाठी पैसा नाही म्हणून मनातल्या मनात कुढत होती. ऍनिमिया, कावीळ, श्वासोच्छवासाचा त्रास, अंगदुखी, उलटी व मळमळ यामुळे तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. काही दिवसापासून पोटात जेवण देखील जात नव्हते. तिला आता उठणे बसणे व श्वास घेणे देखील कठीण झाले होते. एकंदरीत तिची आरोग्यस्थिती पाहता शेजारच्यांना देखील काळजी वाटायला लागली होती. अशातच स्थानिक ग्रामपंचायत सदस्या वनिता वासनीक यांनी १३ नोव्हेंबरला आकाशझेप फाउंडेशनचे सचिव साक्षोधन कडबे यांना भ्रमणध्वनी द्वारा संपर्क साधून प्रतिभाची हकीकत सांगितली. साक्षोधन कडबे यांनी लगेचच रामटेक येथील रीआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बोलावले व हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप बोरकर यांची भेट घेऊन प्रतिभाच्या एकूण परिस्थितीची जाणीव करून देत नि:शुल्क उपचाराची विनंती केली.
डॉ. बोरकर यांनी विनंतीला मान देत प्रतिभाला दाखल करून घेतले आणि योग्य उपचार सुरू झाले. या दरम्यान डॉ. बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली आरएमओ डॉ.श्वेता मो व चमूद्वारा सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, दोन युनिट रक्तपुरवठा, योग्य उपचार आणि औषधे यांच्या साहाय्याने प्रतिभा १६ नोव्हेंबरला अगदी ठणठणीत झाली. “मरणाच्या दारात उभी असणाऱ्या प्रतिभाला डॉ. प्रदीप बोरकरांच्या रूपात प्रत्यक्ष माणूसरुपी देव भेटल्याने तिचा जीव वाचला.” अशा संवेदना सुखरूप होऊन घरी जाताना प्रतिभाने व्यक्त केल्या. यावेळी आई सोनाबाई धूर्वे, मुलगा आयुष परतेती यांनी डॉ. प्रदीप बोरकर, वैद्यकीय चमू, लाईफ लाईन रक्तपेढी आणि आकाशझेप फाउंडेशनचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांचे मनस्वी आभार मानले.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space