ऐतिह्यासीक तिर्थक्षेत्र रामटेकच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*ऐतिह्यासीक तिर्थक्षेत्र रामटेकच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष*
– दिडशे कोटींचा प्रस्ताव मंजुर, अपुऱ्या निधीमुळे विकासकामे थंडबस्त्यात
– मुख्यमंत्र्यांचे शब्द फोल ठरणार काय….
– भक्तनिवासाचे काम पुर्णत्वास केव्हा जाणार ?
*रामटेक* -:
अयोध्या, वाराणसी, शेगाव, शिर्डी आणि इतर प्रमुख मंदिरांप्रमाणेच, रामटेक क्षेत्राचा विकास करणे सुद्धा महत्वाचे आहे. अयोध्येत श्री राम मंदिराच्या बांधकामाशिवाय भगवान श्री राम यांची मुर्तीही तेथे स्थापीत करण्यात आली, असे असतांनाही मात्र प्राचीन तथा ऐतीह्यासिक वारसा लाभलेल्या रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासाकडे लक्ष न दिले जाणे आश्चर्यचकित करणारी बाब आहे. माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे यापूर्वी २०१७ मध्ये मुख्यमंत्री असतांना त्यांना देण्यात आलेल्या पत्रात त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणविस यांचे लक्ष वेधले होते रामटेक क्षेत्राच्या विकासासाठी १५० कोटी रुपयांच्या तिर्थक्षेत्र विकास प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती मात्र निधी अद्यापही रामटेकला पूर्णपणे मिळालेला नाही. यामुळे, तीर्थक्षेत्र विकासाच्या प्रस्तावाखाली अनेक विकासाची कामे अर्धवट थंडबस्त्यात पडलेली आहेत. रामटेक गडमंदीर व परिसरातील विकासकामे भंगार अवस्थेत झालेली आहे. त्या कामांची किंमतही आज बरीच वाढली आहे. विकासकामे जलदगतीने पुर्णत्वास गेली तर येथे दर्शनार्थींची, पर्यटकांची संख्या कमालीची वाढेल. परिणामस्वरूप स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल यात शंका नाही.
या रामनगरीला प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाचा ऐतिह्यासीक वारसा लाभलेला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या मधील राम मंदिराचे उद्घाटन झाले. २२ जानेवारी २०२४ रोजी रामटेक गडमंदिर येथेही कार्यक्रम साजरा करण्यात आला मात्र रामटेक गडमंदिराच्या विकासात ग्रहण लागलेले आहे. सिंधुरागिरी पर्वताच्या माथ्यावर वसलेल्या श्री रामचंद्र मंदिराचा इतिहास २००० वर्षे जुना आहे म्हणजेच चौथ्या शतकाचा आहे. हे दंडकारण्य राज्य होते. हा डोंगर तपोगिरी, रामगीरी, सिंदुरागिरी म्हणून ओळखला जातो. रामायणाच्या काळात, भगवान श्री राम येथे आले आणि त्यांनी अगस्ती मुनीच्या सांगण्यावरून राक्षसांना ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. भगवान रामाच्या या प्रतिज्ञेवरून या शहराचे नाव रामटेक पडले. असे धार्मिक महत्त्व असूनही, भगवान रामाचे गडमंदिर विकासकामांच्या अनुषंगाने वनवासात असल्याचे दिसुन येत आहे. पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर, अयोध्या येथे एक नवीन राम मंदिर बांधले गेले. नवीन रेल्वे स्थानकापासून तर नवीन विमानतळांपर्यंत येथे पुष्कळ विकासकामे पार पडली परंतु त्या तुलनेत रामटेकमध्ये प्राचीन धार्मिक श्री राम मंदिर क्षेत्र विकसित झाले नाही. विकासात खूप दुर्लक्ष केल्या गेले आहे. रामटेक क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने २१ मे २०१८ रोजी तीर्थयात्रा विकासाच्या प्रस्तावासाठी १५० कोटींना मान्यता दिली होती. मात्र काम सुरू झाले आणि सरकार बदलले. हे काम आता कासव गतीने सुरू आहे. पहिला हप्ता म्हणुन ४९.२८ कोटी मंजूर रकमेचे काम सुरू झाले. सन २०१८ पासून गडमंदीर गेट चे काम सुरू आहे मात्र ते अपूर्ण आहे. माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी स्वत:च्या खर्चाने बनविलेले प्रवेशद्वार सध्या रामटेकचा गौरव वाढवत आहे. वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले आहे की रामटेकच्या विकासासाठी २०० कोटी पेक्षा जास्त रक्कम मंजूर झाली आहे. यासह, रोप वे मंजूर असल्याचे म्हटले आहे, परंतु काम अद्यापही सुरू झाले नाही. मंदिराच्या यात्रा निवासस्थानाचे काम ५ वर्षांपासून सुरू झाले आहे जे अद्याप पूर्ण झाले नाही. राम मंदिर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहे आणि विभागाचे याकडे लक्ष नाही. वराह प्रवेशद्वार आणि राम मंदिराच्या मुख्य भैरव प्रवेशद्वारामध्ये तडे गेले आहेत. त्यांना लोखंडाचा तात्पुरता आधार दिला गेला आहे. प्रवेशद्वाराचे लाकडाचे दरवाजे सडलेले आहेत. मंदिराचा इतिहास सांगण्यासाठी सिमेंट चे चबुतरे तयार केले गेले होते, परंतु मंदिराचा इतिहास लिहिलेला नाही. गडमंदीराच्या पायऱ्यांचे दगड बाहेर येत आहेत. प्रवेशद्वारांवर झाडे वाढली आहेत. पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नाही. तेव्हा यातून विकास कसा होईल हे एक प्रश्नचिन्ह आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space